सोमवार, १४ डिसेंबर, २०१५

"किती भोगलं भोगलं म्हणून ...."किती भोगलं भोगलं
म्हणून रडगाणं गाशील
रोज मरे त्याला कोण रडे
म्हणशील  .....!!

तूच ती   ....
एकल्या पेक्षा दुकलं बरं
म्हणून लग्न करशील
एका वळचणीवरून
दुस-या वळचणीवर बसशील   ...!!
किती दिवस कोरी पाटी जपशील
आणि पुन्हा पुन्हा  त्यावर
सीता द्रौपदीच गिरवशील   ....!!

तूच ती   ....
सहनशीलतेचा कधीतरी
टाहो फोडशील
रूढि परंपरांच्या मुंग्यांना
साखर चारून किती पोसशील
कधीतरी त्यांच्यावर
लक्ष्मणरेखा  फिरवशील   ....!!

तूच ती   ....
तुझ्यातल्या शक्तीला
कधीतरी जागवशील
सृजनतेच्या गर्भाला
नखं लावणा-या श्वापदांना
कधीतरी चिरडशील   ....!!

तूच ती  ....
स्वतःच्या खोडांना
स्वतःच्या फांद्यांना
स्वतःच्या फुलांना
स्वतःच्या मुळानां
स्वतःच्या बिजांना
जीवापाड़ जपशील
आणि पुन्हा पुन्हा
नव्याने उगवशील   ...!!

तूच ती   .....
अनादि अनंत
नवसृजनतेची
पहाट आहेस
तुझी तुलाच तू
कधीतरी  उमगशील   ...!!!

   
                                            "  समिधा "
                                                           

२ टिप्पण्या:

  1. समिधा खूप छान कविता आहे. खरंतर ही कविता नसून तुमच्या भावनांचे अतिशय प्रगल्बतेने केले विवेचन आहे.
    अतिशय सुंदर असेच लिहीत रहा
    तुम्हाला माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा।।।

    उत्तर द्याहटवा