बुधवार, १८ नोव्हेंबर, २०१५

" सखे.…!"




सखे   ....!
मी तुझ्यावर जळते   …!
तरी तुझे कौतुक करते  .
तुज जवळ जे आहे   …
मला हवे होते   …!
मज जवळ ते सर्व   …
तेवढेच केवळ नको होते    …!
तू घेतेस भरारी आकाश पल्याड
माझी असते माझ्याच आत
कधी दाराचे तोरण
तर कधी  …
खिडक्यांचे पडदे पहात   …!
तू   .... जेंव्हा माणसं वाचीत
त्यांचे स्वभाव रेखीत असते  ....
मी वृंन्दावनासमोर
रांगोळी काढत
तूळशीचे नशीब
भोगत असते   .... !!
तू … वाचत असते
शेक्सपीयर   … गटे
आणि बरंचकाही   …!
मीही वाचते ना !
लक्ष्मीपूजन पोथ्या   … शनिमहात्म्य
आणि बरंचकाही   …!!
आता मला भेटत नाहीत
शांता शेळके   …इंदिरा संत
लेकीच्याही पुस्तकात   …
मला वाचायची आहे
अध्यात्मातून अरुणा ढेरे  …
पहायचे आहे निरजाचे  "स्त्रिउत्खनन " …
उतरवायचाय माझ्यात 'तस्लीमाचा' बंड  ....
आणि फोडायचाय 'मल्लिका शेखचा '
स्त्रीभग्नतेचा टाहो  …!!
तू   .... घेऊन चल ना मला
तुझ्या पखांच्या आड़
भांडीकुंडी
स्वैपाकपाणी
न्हाणीधूणी
भजनपूजन
नोकरीचाकरी
या कुंपण पल्याड   …!!
जिथे माझ्या अस्तित्वाला
महत्व मिळेल   …!
माझ्या अर्थाला
सामर्थ्य मिळेल   …!!
सखे   .... !
मी तुझ्यावर  जळते
तरी तुझ्यातच जगते   ....!!


                                                    " समिधा "





 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा