बुधवार, १९ ऑगस्ट, २०१५

" तुझा राग जेंव्हा भांडयांवर काढ़तेस... !!"



भांडी चुपचाप असतात   …
वापरून वापरून चमक गेलेली तीही
आणि तुही   .... !
रोजचाच त्यांचा नकोसा आवाज
आणि मुर्दाड चेहरा    …
रात्री जेवणानंतर खरकटी होउन
पडतात बाजूला    … तीही
आणि तुही    …!
तुला राग येतो तुझ्यातल्या बाईचा   … आईचा
तुझ्यातल्या जाग्या अस्मितेचा    …
परंपरा आणि पुरोगामी  पारंब्यांना
त्रिशंकु सारख्या लोंबणा-या तुझ्या
अस्तित्वाचा    …!!
तुला हवा असतो मोकळा स्वतंत्र श्वास
पण  तो दबलेला घराच्या भिंतीत   …
आणि घराचा उंबरठाही तुला पाय घालून
पाडतो   …!
मग तू किचनमधल्या भांडयांवर
प्रहार करतेस   …
तुझा राग भांडयांवर काढ़तेस  …!
काय असते ते   …?
तुझा दबलेला आवाज   !
तुझा व्यवस्थेविरुद्धचा टाहो !
की , समाजपुरुषाविरुद्धच्या
बंडाची नांदी   …?
की, शरणागती तुझ्यातल्या अस्मितेची   …??


                                                          " समिधा "


२ टिप्पण्या: